नाशिक (वृत्तसंस्था) नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असून गुन्ह्याचं गांभीर्य पाहून याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राणेंना अटक करण्यासाठी पथक पाठवण्यात आले आहे. राणेंच्या अटकेदरम्यान त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाचा आदर राखून तसंच हक्कभंग होणार नाही, याची दक्षता घेऊन कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अडचणीत आलेल्या नारायण राणे यांच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याच्या नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक संतापले असून राणेंवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. संतापलेल्या शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून नाशिकमध्ये भाजपा कार्यालयाची शिवसेनेकडून तोडफोड करण्यात आली आहे. तर जुहूमध्येही शिवसैनिकांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. नारायण राणेंच्या या वक्तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राज्यात तीन ठिकाणी राणेंवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, नाशिक पोलिसांचं एक पथक चिपळूणला रवाना झालं आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश आहेत. दरम्यान चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून नारायण राणेंकडून अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुणे पोलिसांचे पथकही राणेंच्या अटकेसाठी रवाना झाले असल्याचे कळतेय.