जळगाव (प्रतिनिधी) महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी हे रात्रंदिवस कार्य करीत राज्यातील जनतेला अखंडित वीजपुरवठ्यासोबत गतिमान ग्राहकसेवाही देत असतात. याचप्रमाणे मानव संसाधन विभागानेही महावितरणच्या कर्मचाऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या समस्या, तक्रारी व प्रलंबित प्रकरणे गतिमानतेने निकाली काढून झिरो पेंडन्सी हेच ध्येय ठेऊन ऊर्जा विभागाच्या या प्रकाशदूतांना नवऊर्जा देण्यासाठी सदैव कार्यरत राहावे, असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) डॉ. नरेश गिते यांनी केले.
महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नाशिक, जळगाव, कल्याण, रत्नागिरी व भांडुप परिमंडळातील मानव संसाधन, जनसंपर्क आणि औद्योगिक संबध विभागाच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र, एकलहरे येथे बुधवारी (दि.१६) रोजी पार पडलेल्या आढावा बैठकीत डॉ. नरेश गिते आभासी पद्धतीने उपस्थित राहून बोलत होते. बैठकीला मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, प्रशिक्षण व सुरक्षा केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक देवेंद्र सायनेकर, मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे आणि भूषण कुलकर्णी, उपमहाव्यवस्थापक सुनील पाठक व्यासपीठावर उपस्थित होते.
बैठकीत डॉ. गिते पुढे म्हणाले की, वीज ग्राहकांना ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी कार्यरत कर्मचाऱ्यांना संपूर्णतः तणावमुक्त ठेवण्यासाठी मानव संसाधन विभागाने स्वयंस्फूर्तीने कार्यरत असले पाहिजे. त्यांची प्रलंबित असलेले विविध प्रकारची प्रकरणे हे विहीत वेळेतच निकाली काढणे, कर्मचाऱ्याचा कामावर अपघात झाल्यास त्वरीत मदत देणे, मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत देणे त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास सर्व क्लेम वेळेत अदा करावेत. यासाठी मानव संसाधन विभागातील अधिकाऱ्यांसोबतच संबंधित सर्वांनीच जबाबदारी निष्ठेने पार पाडावी. चांगले व गतिमान कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना सन्मानित केले जाईल तर कर्मचाऱ्यांना कंपनीच्या नियमाप्रमाणे देण्यात येणाऱ्या सेवा, सवलती व सुविधांना जाणीवपूर्वक आडकाठी आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर गंभीर कारवाई केली जाईल, असा इशाराही संचालक डॉ. गिते यांनी दिला.
अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित प्रकरणे, कर्मचारी निलंबन, बिंदूनामावली नोंदणी, कर्मचारी गोपनीय अहवाल, सेवानिवृत्ती उपदान, वार्षिक वेतनवाढ, पदोन्नती पॅनल, विद्युत सहाय्यक पदोन्नती, सेवानिवृत्ती वेतन, वैद्यकीय देयके, भविष्य निर्वाह निधी नामांकन, आरोपपत्र, अनुशेष भरती इत्यादी प्रकरणांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून उर्वरित व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन सर्व प्रकरणे तात्काळ निकाली काढावी, असे निर्देश यावेळी संचालक डॉ. गीते यांनी दिले.
उपमहाव्यवस्थापक सुनील पाठक यांनी बैठकीच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. तर सेवानिवृत्त कर्मचारी यांचे अंतिम उपदानासंदर्भात चांगले कार्य केल्याबद्दल सहायक महाव्यवस्थापक महेश बुरंगे व संगमनेर विभागाचे उपव्यवस्थापक सचिन ढोले यांचा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांनी बैठकीत गौरव केला. या बैठकीला सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, सहायक महाव्यवस्थापक शशिकांत पाटील, नेमीलाल राठोड, महेश बुरंगे, वैभव थोरात, धैर्यशील गायकवाड, हविषा जगताप व बन्सीलाल पवार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, अरुण शेलकर, आप्पासाहेब पाटील यांच्यासह मानव संसाधन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.