मुंबई (वृत्तसंस्था) पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने मोठी कारवाई करताना शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांची ७२ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईनंतर राऊत यांच्या अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने नोटीस बजावल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता या प्रकरणी ईडीने प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात समन्स बजावले होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या अकाउंटमधून काही व्यवहार वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच व्यवहाराशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावले होते.
पीएमसी बँकेतील ४ हजार ३०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ईडी मार्फत तपास सुरू आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रवीण राऊत यांना गेल्या फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. पीएमसी बँकेचे ९० कोटी रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील मनी लाँडरिंग प्रकरणात ईडी चौकशी करत आहे. त्यात प्रवीण राऊत व त्यांची पत्नी माधुरी राऊत यांची चौकशी करण्यात आली आहे व त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.
दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावला होता. त्यांना २९ डिसेंबर रोजी ईडी कार्यालयामध्ये हजर होण्याचे सांगितले होते. पण राऊत यांनी ईडीकडे यासाठी मुदत मागितली होती. PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती. गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडीकडे गेलं.
वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आले. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना ५५ लाख रुपये देण्यात आले होते. त्यामुळेच हे पैसे का घेतले गेले? याची माहिती ईडीला हवी आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले ५५ लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले होते, असं या शपथपत्रात नमूद आहे.