चाळीसगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील निराधार, अपंग, विधवा व वृध्दांसाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून मिळणारी आर्थिक मदत तात्काळ मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा सचिव ॲड. विलास बडगुजर यांनी चाळीसगाव उपविभागीय अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव ॲड. विलास बडगुजर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निराधार, अपंग, विधवा, वृध्दांसाठी राज्य व केंद्र सरकारच्यावतीने विविध योजनांच्या माध्यमातून दरमहा आर्थिक मदत केली जाते. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनांच्या माध्यामातून दरमहा ठराविक रक्कम देऊन त्यांचे जीवन सुकर केले जाते. मात्र, गेल्या सप्टेंबर व ऑक्टोबरचे जळगाव जिल्हयातील लाभार्थ्यांना हे अनुदान राज्य सरकारकडून प्राप्त झाले नसल्याने दिवाळी सण कसा साजरा करावयाचा असा प्रश्न राज्य सरकार पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. तर केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचे अनुदान मोदी सरकारने गेल्या सहा महिन्यांपासून दिलेले नाही. त्यामुळे या योजनामध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांसमोर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे. अगोदरंच कोरोना महामारी व महापूराच्या अस्मानी संकटामुळे आर्थिक संकटांचा सामना करत आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर थकीत अनुदान विनाविलंब त्वरित अदा करून जळगाव जिल्हयातील या योजनांचा लाभ घेणार्या गोरगरिब, विधवा, अपंग, वृध्द, परित्कता यांची दिवाळी गोड करावी तसेच चाळीसगाव तालुक्याची गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेली संजय गांधी निराधार समितीची नेमणूक करण्याची मागणी यात करण्यात आली. तरी आपण दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब, विधवा, अपंग, वृध्द, परित्यक्ता स्त्रियांना राज्य व केंद्र सरकारच्यावतीने विविध योजनांच्या माध्यमातून दरमहा मिळणारी आर्थिक मदत तात्काळ जमा करावी, अशी विनंतीही या निवेदनाद्वारे करण्यात आली.