धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना शासनाची परवानगी व निधी संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली असून याबाबत सकल मराठा समाज आणि बौद्ध समाजाची आज शहरात संयुक्त पत्रकार परिषद झाली.
माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांसंदर्भात माहिती अधिकारातून कागदपत्र मिळवले आहेत. आज याबाबत पत्रकार परिषदेत लेखी पुरावे सादर करत खळबळ उडवून दिली आहे. यावेळी मराठे समाज अध्यक्ष भरत मराठे, बौद्ध समाजाचे गोवर्धन सोनवणे, साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे, मराठा नेते जानकीराम पाटील, गोपाल पाटील, सीताराम मराठे, मराठा सेवा संघाचे जगदीश मराठे, मराठा समाजाचे ट्रस्टी चेतन पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दीपक वाघमारे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा, यासाठी आपण नगरसेवक असताना काही दिवस उपोषण केले होते. त्यानंतर आपली मागणी मान्य होत पालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव करण्यात आला होता. त्यानंतर आता कुठे मागणी पूर्ण होताना दिसतेय. परंतु त्यातही पुतळ्यांसंदर्भात प्रशासन निष्काळजीपणाची भूमिका घेत आहे. दोघं पुतळ्यांच्या चबुतऱ्यांसाठी निधी उपलब्ध आहे. परंतु पुतळ्यांसाठी निधी नसल्याचे पालिका प्रशानाने दिलेल्या कागदांवरून स्पष्ट होत आहे. तसेच पुतळ्यांची उंची, वजन माहित नसताना चबुतऱ्याचे काम सुरु आहे. वास्तविक बघता पुतळे बसविण्याआधी शिल्पकाराकडून त्याच्या प्रतीकात्मक प्रतिमा अवलोकनासाठी देणे गरजेचे असते. तसेच याबाबत समाज बांधवांची एक समिती बनवून त्यांच्यासोबत चर्चा करूनच पुतळ्यांच्या संदर्भात निर्णय घेतला गेला पाहिजे होता. परंतु शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांसंदर्भात पालिका प्रशासनाने कुठलीही समिती गठीत केलेली नाही. त्यावरून प्रशासन मनाला पटेल तसे काम करत आहे. शिल्पकाराचे नाव पालिका प्रशासन सांगते. मात्र, याबाबतचे कुठलेही टेंडर प्रक्रिया झाल्याची माहिती तसेच शासनाच्या विविध परवानग्यांची माहिती पालिका प्रशासनकडे नाहीय. त्यामुळे पुतळ्यांची रंग, उंची, वजन हे अस्पष्ट आहे. जर याच महत्वाच्याच गोष्टीच जर माहित नसतील तर चबुतऱ्याचे काम कोणत्या दर्ज्याचे होतेय?, याबाबत संभ्रम आहे. भविष्यात काही दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण राहील? असाही सवाल श्री. वाघमारे यांनी उपस्थित केला. तसेच धरणगावातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघं पुतळ्यांसाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच दोघं पुतळ्याच्या परिसरात करण्यात आलेले बांधकामामुळे दोघं पुतळ्यांच्या परिसराचे सौंदर्य खराब होत आहे. वाहतुकीला अडचण होत आहे. त्यामुळे ते बांधकाम तोडण्यात यावे आणि पालिका प्रशासनाने वरील सर्व बाबींचा तत्काळ खुलासा करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.
मराठे समाज अध्यक्ष भरत मराठे यांनी देखील प्रशानासाने सर्व गोष्टी पारदर्शकपणे केल्या पाहिजेत. समिती गठीत करून सर्वांसोबत चर्चा करून दोघं स्मारकांची निर्मितीचे काम सुरु केले पाहिजे होते. परंतु तसे झाले नाही. तरी पालिका प्रशासनाने तत्काळ याबाबत सर्व लेखी खुलासे केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघं पुतळ्यांसाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच नवीन पुतळे विराजमान झाल्याशिवाय जुने स्मारकांना हात लावू देणार नाही,असेही सांगीतले. गोपाल पाटील, सीताराम मराठे यांनी देखील नवीन पुतळे विराजमान झाल्याशिवाय जुने स्मारकांना हात लावू देणार नाही. जर असे करण्याचा प्रयत्न झाला तर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील दिला. बौद्ध समाजाचे गोवर्धन सोनवणे, साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी देखील दोघं पुतळ्याच्या परिसरात करण्यात आलेल्या बांधकामाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच प्रशासनाने सामंजस्याने हा विषय हाताळावा, असेही सांगीतले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांसंदर्भात लोकवर्गणी गोळा करायची असल्यास संपूर्ण गावासह तालुक्यातून निधी गोळा केला जाईल, जेणे करून प्रत्येकाचा सहभाग त्यात असला पाहिजे, अशी भूमिका मराठा नेते जानकीराम पाटील यांनी मांडली. तसेच दोघं महापुरुषांच्या पुतळ्यांच्या उंची संदर्भात त्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. उड्डाण पुलाच्या उंची पेक्षा दोघं पुतळ्यांची उंची जास्त पाहिजे, जेणे करून पुतळ्यांच्या डोक्यावरून कुणी जात असल्याचे भासू नये. कुणालाही विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने काम सुरु असल्याबाबत लोकांमध्ये तीव्र नाराजी असून लवकर याबाबत प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा गंभीर इशारा देखील मराठा नेते जानकीराम पाटील यांनी दिला. यावेळी प्रकाश सपकाळे, मिलिंद शिरसाठ, गोपाल माळी, सुभाष अहिरे, शिरीष रोकडे, सुनील माळी, अजय मैराळे, अप्पा पारेराव, रोहित सोनवणे, स्वप्नील सोनवणे,राज पवार, अभिजित सोनवणे, मयूर भामरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.