जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांची जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी जाहीर सभा होणार आहे. शिंदे आणि ठाकरे हे दि.१० रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असल्यामुळे दोघांच्या भाषणांकडे सर्वांचे लक्ष लागू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दि. ९ रोजी पाचोऱ्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी येणार होते, मात्र त्यांच्या दौऱ्यात बदल झाला असून दि. ९ रोजीचा कार्यक्रम दि. १० सप्टेबर रोजी होणार आहे. तसेच याच दिवशी पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील जळगावात येणार आहेत. त्यामुळे एकाच दिवशी पाचोरा व जळगाव येथे दोघांची तोफ धडाडणार आहे.
महापालिकेच्या आवारात सरदार वल्लभभाई पुतळा साकारण्यात येत आहे. या पुतळ्याचे अनावरण उध्दव ठाकरे यांच्याहस्ते होणार आहे. महापालिकेचा शासकीय कार्यक्रम असल्याने महापौर जयश्री महाजन व आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी दि.१० रोजी पाचोऱ्यात येत असल्याने तिघं मंत्री पाचोऱ्याच्या कार्यक्रमाला जाणार असून सरदार वल्लभाईंच्या पुतळ्याच्या अनावरणाला त्यांची अनुपस्थिती राहिल, हे स्पष्ट झाले आहे.