भुसावळ (प्रतिनिधी) कविता म्हणजे अभिव्यक्त हाेण्याचं सशक्त माध्यम. कमी शब्दात अतिशय माेठा आशय या साहित्य प्रकारातून मांडला जाताेे. तुमच्या-आमच्या काळजात दाबलेला उमाळा म्हणजे कविता हाेय. कवितेत मांडलेला मायबाप समजून घेण्यासाठी संवेदनशील काळीज लागतं, असं परखड मत पुण्याचे कवी देवा झिंजाड यांनी व्यक्त केले.
भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानने स्वर्गीय पुष्पा वसंतराव पाटील यांचे स्मरण करण्यासाठी तीन दिवसीय पुष्पांजली ऑनलाईन प्रबाेधनमाला आयाेजित केली आहे. त्यात मंगळवारी ‘मायबापाच्या कविता’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना ते बाेलत हाेते. कवी म. भा. चव्हाण यांच्या ‘आई उन्हाची सावली आई सुखाचे नगर, निळ्या आकाशाएवढा तिच्या मायेचा पदर’ आणि कवयित्री बहिणाबाई चाैधरींच्या देरे देरे याेग्या ध्यान… एक मी काय सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ या कवितांनी त्यांनी व्याख्यानाला सुरुवात केली. संकटाचा पहाड फाेडण्याची ताकद मायबापांनी दिलेल्या संस्कारांच्या शिदाेरीत असते. मात्र, अलिकडची टेक्नाेसॅव्ही पिढीला मळकटलेली बंडी, फाटकं धाेतर घातलेल्या बापासाेबत चालायला अन् उभी राहायला लाज वाटते. पण हे चित्र बदलायला हवं, असा संदेशही त्यांनी स्वरचित कवितांतून दिला. संघर्ष, समाज, शिक्षण, व्यथा, वेदना, मायबाप, लेक असे नानाविध विषयांची गुंफण त्यांनी केली. ‘फुले’ नावाची कविता खर्जातील आर्जवात सादर करताना त्यांना गहिवरून आले हाेते. ‘मुंढावळ्यांचा फुलांचा स्पर्श…शेवटचा ठरला गं आई, त्यानंतर फुलांशी माझं नातचं तुटलं गं बाई’ या ओळीतून लेकीबाळींना सासुरवास कसा हाेताे हे मांडले. त्यातील प्रत्येक शब्द हा रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारा ठरला. त्यानंतर त्यांनी ‘मायबाप’ कवितेतील ‘ऋण आईच्या गर्भाचे या जन्माचं फेडावं, आई-बापाच्या सावलीत हिरव्य काेंबाने वाढावं’ या ओळी सादर करून व्याख्यानाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.दरम्यान, या प्रबाेधनमालेने भुसावळ शहराच्या सांस्कृतिक वैभवात, लाैकीकात नक्कीच भर पडेल. सशक्त अशी एक समृद्धशाली वैचारीक चळवळ या माध्यमातून उभी राहत असून ती पथदर्शी आहे, असे गाैरवाेद्गारही त्यांनी व्याख्यानातून काढले.
आईच्या संतापात असतं प्रेमाचं अत्तर
माय या दाेन अक्षरी शब्दात संकटांचं वादळ पेलण्याची क्षमता आहे. तिचं मुलं उन्हात उभं असेल तर ती ‘इकडे मर सावलीत’ असं संतापात म्हणते. ती जाे मर शब्द वापरते ताे म्हणजे प्रेमाचं अत्तर आहे. पाेराला उन्हाच्या झळा लागू नये ही त्यामागची भावना असते. काळजाच्या तुकड्याशी काळजाने काळजीपूर्वक साधलेला ताे संवाद असताे, असेही कवी झिंजाड म्हणाले. आई जग दावणारी….आई हंबरणारी गाय, शिळपाख खाऊनही देई लेकरांना साय’ या कवितेतून त्यांनी आईची महती वर्णिली.
प्रबाेधनामलेचं यंदा तृतीय वर्ष
पुष्पांजली प्रबाेधनमालेचं यंदाचं तृतीय वर्ष आहे. सांस्कृतिक चवळव प्रवाहीत राहावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी प्रास्ताविकात नमूद केले. उपक्रमाासाठी जळगावचे बांधकाम व्यावसायिक अजय बढे यांचे पाठबळ लाभत आहे. सुत्रसंचालन योगेश इंगळे यांनी केले.प्रकल्पप्रमुख अमित चाैधरी, समन्वयक प्रा. श्याम दुसाने, सहसमन्वयक आर. डी. साेनवणे यांच्यासह नियाेजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
















