पुणे (वृत्तसंस्था) पुणे शहरातील कोंढवा परिसरात चुलत दिराने दोन चिमुकल्यासह त्यांच्या आईचा निर्घृण खून केला आणि त्यानंतर त्यांना घरात जाळून टाकल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. आम्रपाली वाघमारे (वय 30) रोशनी (वय 6) आणि 4 अशी या घटनेत खून व जाळण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या संदर्भात अधिक असे की, आरोपी वैभव वाघमारे आणि आम्रपाली हे मूळचे पुण्याबाहेरील शहरातील होते. आरोपी वैभव हा आम्रपाली हिचा चुलत दीर आहे. आम्रपाली ही विवाहित असतानाही या दोघातही प्रेमसंबंध होते. यातूनच काही महिन्यांपूर्वी दोघेही पुणे शहरात पळून आले होते. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिसोळी येथे ते भाड्याच्या घरात राहत होते.
दरम्यान आम्रपालीच्या चारित्र्यावर आरोपी वैभव संशय घ्यायचा. त्यातूनच बुधवारी मध्यरात्री दोघांमध्ये वाद सुरु झाला. हा वाद वाढल्यानंतर वैभवने आम्रपाली हिला ठार मारले. हा सर्व प्रकार पाहून मुलं रडत असताना वैभवने त्यांनाही ठार केले. त्यानंतर तिघांचे मृतदेह त्याने घरातच जाळले. हा सर्व प्रकार झाल्यानंतर आरोपी वैभवने घरातून पळ काढला होता. परंतू घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पसार झालेला आरोपी वैभव याचा शोध घेऊन त्याला अटक केली.