देहरादून (वृत्तसंस्था) उत्तराखंडमधील भाजप विधीमंडळ पक्षाने युवा नेते पुष्कर सिंह धामी यांची आपला नवा नेता म्हणून निवड केली आहे. धामी हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. धामी हे कुमाऊँमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील खातिमामधून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडचे ११ वे मुख्यमंत्री असणार आहेत. माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पुष्कर सिंह धामी यांच्या नावाची घोषणा केली. तसंच त्यांचं पुष्पहार घालून स्वागत केलं. संवैधानिक अडचणीमुळे तीरथ सिंह रावत यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आपला राजीनामा सोपवलाय. रावत यांना केवळ चार महिने मुख्यमंत्रीपदाचा अनुभव मिळाला.
‘माझ्या पक्षानं एका सामान्य कार्यकर्त्याला सेवेची संधी दिलीय. जनतेच्या मुद्यांवर आम्ही सर्वांचं सहकार्य घेऊन काम करू’ अशी प्रतिक्रिया पुष्कर सिंह धामी यांनी विधिमंडळ दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर व्यक्त केलीय.
कोण आहेत पुष्कर सिंह धामी?
धामी यांनी माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून काम केले आहे. धामी हे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते. धामी यांचा जन्म १६ सप्टेंबर १९७५ मध्ये पिथोरागडमधील डीडीहाट तालुक्यातील टुंडी या गावात झाला. त्यांचे वडील सैन्यात होते. त्यामुळे ते लहानपणापासूनच शिस्तप्रिय आहेत. त्यांनी मनुष्यबळ व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्यांनी एलएलबी देखील पूर्ण केलं आहे. २०१७ मधील निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपला व्यवसाय वकिली असल्याचे नमूद केले होते.
धामी यांनी आपल्या राजकिय कारकिर्दीची सुरुवात भाजपची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून केली. १९९० ते १९९९ पर्यंत त्यांनी जिल्हास्तरापासून ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांवर काम केले. त्यानंतर त्यांची एबीव्हीपीचे प्रदेश मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.