छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) सिमेंट काँक्रीट मिक्सरच्या ट्रकने दुचाकीला समोरून धडक दिल्यानंतर ट्रकचे चाक पित्याच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी गंभीर जखमी आहे. पैठण रोडवरील गेवराई तांडा येथे २ डिसेंबरला रात्री ८.३० वाजता हा भीषण अपघात झाला. मृत बापाचे शिवराम भानुदास जाधव (५४, रा. शेकटा, ता. पैठण), असे तर अश्विनी वाघचौरे (२८, धुपखेडा), असे जखमी लेकीचे नाव आहे.
शिवराम जाधव आणि त्यांची मुलगी अश्विनी वाघचौरे हे दोघे शेकटा येथे जाण्यासाठी २ डिसेंबरला रात्री ८ च्या सुमारास दुचाकीने निघाले होते. साधारण ८.३० वाजता त्यांची दुचाकी गेवराई तांडा गावाजवळ पोचली. त्याचवेळी पैठणहून छत्रपती संभाजीनगरकडे सिमेंट मिक्सरचा भरधाव ट्रक येत होता.
मिक्सरचालकाने बाप-लेकीच्या दुचाकीला समोरून धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, शिवराम जाधव आणि त्यांची मुलगी अश्विनी वाघचौरे हे दोघेही रस्त्यावर कोसळले. त्याचवेळी मिक्सरचे एक चालक शिवराम जाधव यांच्या डोक्यावरून गेले. त्यात डोक्याचा चेंदामेंदा झाला. ते जागीच ठार झाले, तर मुलगी अश्विनी गंभीर जखमी झाली.