नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या कुटुंबाला सुरक्षेच्या कारणास्तव अंडरग्राउंड असलेल्या शहरात पाठवलं असल्याचं म्हटलं जात आहे. हे शहर अण्वस्त्र हल्ल्यापासून सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. रशियातील एका प्राध्यापकाने असा दावा केला आहे.
डेली मेलने त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे की, मॉस्को स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे माजी प्राध्यापक वालेरी सोलोवी यांनी अनेक दावे केले आहेत. अणुयुद्ध सुरु झालंच तर कुटुंब सुरक्षित रहावं यासाठी पुतीन यांनी हे पाऊल उचललं असल्याचं प्राध्यापकाने म्हटलं आहे. या जागेचं ठिकाणही अत्यंत गुप्त ठेवण्यात आलं आहे.
कुटुंबियांसाठीच बंकर तयार केलं
प्राध्यापकाने म्हटलं की, पुतीन यांनी ज्या अंडरग्राउंड शहरात त्यांच्या कुटुंबियांना पाठवलं आहे ते सायबेरियातील अल्ताई पर्वताजवळ आहे. हे एक अलिशान आणि हायटेक असं बंकर आहे. एवढंच नाही तर या बंकरला अणुयुद्धाच्या परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने तयार करण्यात आलं आहे. पुतीन यांच्या कुटुंबियांसाठीच बंकर तयार केलं असल्याचा दावा प्राध्यापकाने केला.
पुतीन एक मानसिक गुप्त रोगाने ग्रासलेले
पुतीन एक मानसिक गुप्त रोगाने ग्रासलेले असल्याचंही प्राध्यापक वालेरी सोलोवी यांनी म्हटलं आहे. युक्रेन युद्धासाठी पुतीनच जबाबदार असून त्यांच्यामुळेच हा संघर्ष पेटला असल्याचं प्राध्यापकाने म्हटलं. एका बाजुला प्राध्यापकाने अनेक आरोप आणि दावे केले असताना रशियातील काही अधिकाऱ्यांनी त्याची अनेक तास चौकशी केल्याचंही समोर आलं आहे.