मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीच्या कार्यालयातील बंडखोर नेत्यांच्या फोटोंना कार्यकर्त्यांनी काळ फासल्याची आज घटना घडली. कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड पोहोचले आणि त्यांनी या फोटोंवरील काळं पुसलं. या घटनेदरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यालयातील वातावरण मात्र चांगलंच तापल्याचं चित्र होतं.
सायंकाळी मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांचा प्रक्षोभ बघायला मिळाला. संतप्त कार्यकर्त्यांनी बंडखोर नेत्यांचे फोटो काढले आणि त्यांना काळं फासायला सुरुवात केली. त्यांनी सुनिल तटकरे आणि छगन भुजबळांच्या फोटोला काळं फासलं. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. कार्यकर्त्यांनी फोटोंना फासलेलं काळं जितेंद्र आव्हाडांनी पुसलं आणि ते फोटो पुन्हा भिंतीवर लावण्यात आले. या दरम्यान मात्र गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र होतं. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत बंडखोरांचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी ‘आम्ही साहेबांसोबत’ अशा पाट्या झळकावल्या होत्या.
दरम्यान, शरद पवारांनी राष्ट्रवादीतील बंडावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांनी आपल्याशी कोणतीही चर्चा केली नसून हे बंडच असल्याचं त्यांनी सांगितलं. या नेत्यांनी पक्षादेश धुडकावून हे पाऊल उचललं आहे, राष्ट्रवादीचे बडे नेते जरी आपल्याला सोडून गेले असले तरी त्याची चिंता नाही असं ते म्हणाले. सोडून गेले याची चिंता नाही तर सोडून गेलेल्यांच्या राजकीय भविष्याची चिंता आहे असा एक प्रकारचा इशाराच त्यांनी बंड केलेल्या नेत्यांना दिला आहे. तर कोणतीही माहिती न देता काही कागदांवर स्वाक्षरी केली असल्याचे काही आमदारांनी म्हटले असल्याचे दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.