नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुजरातमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राहुल गांधी राज्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, काँग्रेसवर नाराज असलेले गुजरातमधील पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांची राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांची नाराजी दूर करण्यात ते यशस्वी ठरले आहे. याचवेळी पक्षात वरचढ नेत्यांनाही राहुल गांधींनी चाप लावला. यासाठी काँग्रेसचे प्रभारी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची खेळी राहुल यांनी खेळली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हार्दिक पटेल यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केला होता. मात्र, त्यांनी भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली होती. त्याचवेळी त्यांनी तोंडभरून भाजपचे कौतुक केले होते. यामुळे पटेल हे भाजपशी जवळीक साधू शकतात, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. ते म्हणाले होते की, भाजपने मागील काही काळात घेतलेल्या निर्णय राजकीय हेतून घेतले आहेत. असे असले तरी त्यांच्यात निर्णय घेण्याची ताकद आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. भाजपची बाजू न घेता अथवा त्यांची स्तुती न करताही या सत्य गोष्टी आपण स्वीकारायला हव्यात. गुजरातमध्ये काँग्रेसला भक्कम व्हायचे असेल तर आपण निर्णय क्षमता वाढवायला हवी.
पटेल यांनी नुकताच पक्षावर आपल्याला दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप केला होता. नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी माझी पक्षात अवस्था झाली आहे, असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षांनीच केलेल्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र, काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर पटेल यांनी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. ते म्हणाले होते की, मी आतापर्यंत पक्षासाठी 100 टक्के योगदान दिलं आहे. यापुढेही पक्षात काम करत राहीन, असं सांगत पटेल यांनी काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.