मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील दोन बहिणींना गेल्या वर्षी दिलेला शब्द पाळला आहे. त्यांनी सोमवारी के.काव्या आणि कार्थिका या दोन बहिणींना नवीन घराच्या चाव्या प्रदान केल्या. या दोन्ही बहिणींनी मागील वर्षी झालेल्या कवलपरा दुर्घटनेत कुटुंबीयांना गमावले होते. राहुल गांधी यांनी भेट घेऊन त्यांना नवीन घर देण्याचं आश्वासन दिले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी दोन्ही बहिणींना चाव्या प्रदान केल्या. ८ ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या दुर्घटनेत ५९ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर ६९ कुटुंबाचं डोक्यावरील छत गेलं होतं. दुर्घटनेत कार्तिका आणि काव्या यांची आई आणि तीन भावांचा मृत्यू झाला होता. कार्तिका आणि काव्या शिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी असल्याने या दुर्घटनेतून वाचल्या होत्या. राहुल गांधी यांनी दुर्घटनेनंतर कार्तिका आणि काव्याची भेट घेत आपल्याला शक्य ती सर्व मदत करु असं आश्वासन दिलं होतं. राहुल गांधी यांनी केलेल्या मदतीमुळे मुलींना दिलासा मिळाला आहे. ”दुर्घटनेनंतर जेव्हा ते आम्हाला भेटले तेव्हा त्यांनी आम्हाला घराची ऑफर दिली होती. गेल्या भेटीवेळी त्यांनी आमच्यासाठी मिळवलेल्या जमिनीची कागदपत्रं दिली आणि यावेळी त्यांनी घराच्या चाव्या दिल्या आहेत. पुन्हा एकदा सामान्य आयुष्य जगण्यासाठी मिळत असल्याने आम्ही आनंदी आहोत” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
















