नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रातील मोदी सरकारवर वेगवेगळ्या निर्णयावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे टीका करताना दिसतात त्यातच त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी मनरेगा संदर्भात एक ट्विट केले. त्यात त्यांनी मनरेगा मजुरांना पैसे काढण्यासाठी होत असलेल्या त्रासावरून केंद्र सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. मनरेगावर काम करणाऱ्या मजुरांना मजुरीचे पैसे काढण्यासाठी होत समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. या वृत्ताचा हवाला देत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर धोरणांवरून टीका केली आहे.
आधी तुघलकी लॉकडाउन लागू केला, कोट्यवधी मजुरांना रस्त्यावर आणलं. नंतर त्यांचा एकमेव आधार असलेल्या मनरेगाची कमाई बँकांमधून काढणंही अवघड करून ठेवले. मोदी सरकार फक्त बोलण्यापुरतच असून, गरीबांचे अधिकारांची पायदळी तुडवत आहे,” असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.
वृत्तपत्राने केलेल्या पाहणी अहवालातील आकडेवारीचा हवाला देत वृत्त प्रसिद्ध केले होते. पाहणीनुसार एका मजुराला मनरेगावरील कामापोटीचा मोबदला बँकेतून काढण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलेलं आहे. एका मजुराला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्यासाठी ६ रुपयांपर्यंत खर्च येतो. त्याचबरोबर बँकेत जाण्यासाठी ३१ रुपये आणि एटीएमपर्यंत जाण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी ६७ रुपये खर्च करावा लागत असल्याचे पाहणीत म्हटले आहे.