नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ५ राज्यांच्या या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. राहुल गांधी यांनी पक्षाचा पराभव स्वीकारला आहे. जनमताचा आम्ही आदर करतो. निवडणुकीत जनतेचा कौल मिळवणाऱ्यांना शुभेच्छा आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.
उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागत आहे. यापैकी पंजाब वगळता ४ राज्यांमध्ये आपली सत्ता राखण्यात भाजपला यश येताना दिसत आहे. या निवडणुकीत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा दोन्ही मतदारसंघांमध्ये पराभव झाला आहे. एवढचं काय तर पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनाही पराभवाचा सामना करावा लागतोय.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील पक्षाचा पराभव त्यांनी स्वीकारला आहे. जनमताचा आम्ही आदर करतो. निवडणुकीत जनतेचा कौल मिळवणाऱ्यांना शुभेच्छा आहेत. निवडणुकीसाठी झटलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि स्वयंसेवकांचा आभारी आहे. या निवडणुकीतून आपण धडा घेऊया आणि जनतेच्या हितासाठी अशाच प्रकारे काम करूया, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.
‘अनपेक्षित निकाल’, काँग्रेसने दिली प्रतिक्रिया
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काँग्रेससाठी अनपेक्षित आहेत. जनतेचे आशीर्वाद मिळवण्यात अपयशी ठरल्याचे आम्ही मान्य करतो. पराभवाचे आत्मपरीक्षण करण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी लवकरच पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेणार आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.