मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. याबाबत नुकतीच औपचारिक घोषणा झाली आहे.
भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मत मिळाली. या राजकीय गदारोळात अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी देखील पार पडणार आहे.
राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिलं. तर चेतन तुपे यांनी साळवी यांचा प्रस्ताव मांडला, तर संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिलं. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षांची निवड झाली आहे. दरम्यान, नार्वेकर राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नार्वेकर यांना 164 मते पडली. तर राजन साळवी यांना केवळ 107 मते मिळाली. त्यामुळे नार्वेकर हे मोठ्या फरकाने विजयी झाले. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडली.