कोल्हापूर (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली. शरद पवारांनाच असं राजकारण हवं असल्याचं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात जोरदार टीका केली होती. या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे ३-४ महिने भूमिगत होतात. मग त्यानंतर एखादं लेक्चर देतात. मग पुन्हा ३ ते ४ महिने भूमिगत होतात, अशा शब्दांत पवारांनी राज यांना टोला हाणला आहे.
सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे नेण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. गेल्या काही वर्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास राज ठाकरे यांनी तपासावा,” असं प्रत्त्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं. एक गोष्ट चांगली झाली. बरेच वर्ष ते भूमिगत झाले होते. याचा काही अंदाज येत नव्हता कुणाला. पण ठाकरे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात यायला उत्सुक आहेत हे कालच्या सभेत दिसलं. त्यांचं हेच वैशिष्ट्य आहे ते दोन चार महिने भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन चार महिने ते काय करतात ते मला माहीत नाही, असा चिमटाही शरद पवार यांनी राज ठाकरेंना काढला. मोदीच्या संदर्भातील काय काय भूमिका मांडत होते ते महाराष्ट्राने पाहिलं. त्यात काही तरी बदल झालेला दिसतो. हा गुणात्मक बदल त्यांच्यात झालेला दिसतो. सध्या मोदीच्या बाबतची भूमिका त्यांनी आज घेतली. उद्या काय होईल सांगता येत नाही. पण आज मोदींना अनुकूल अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेत सातत्य नसतं हे अलिकडे आपण पाहिलं आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.