मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. १ मार्च ते ९ मार्च दरम्यान राज ठाकरे अयोध्येत असतील, अशी माहिती मनसेने दिली आहे. राज ठाकरे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत श्रीराम प्रभूंचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहेत. तर ९ मार्चनंतर महिन्याभराच्या काळात राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. १ मार्च ते ९ मार्च दरम्यान राज ठाकरे अयोध्येत असतील, अशी माहिती मनसेने दिली आहे. राज ठाकरे यांना आधीच अयोध्येत जायचं होतं, पण कोरोनामुळे त्यांना जाता आलं नाही. अयोध्या दौऱ्यावरून ९ मार्चला परत आल्यानंतर राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. अयोध्येतून परतल्यानंतर ९ मार्चला मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरे जनतेला संबोधित करतील. यानंतर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात होईल. ९फेब्रुवारी ते १२ एप्रिल या कालावधीमध्ये मनसेची सदस्य नोंदणी होणार आहे. २३ जानेवारी २०२० रोजी मनसेने आपला झेंडा बदलला, तो भगवा झाला. मनसेने हिंदुत्त्वाची कास धरली. पक्षाच्या झेंड्यातील बदल आणि मनसेची मराठीच्या मुद्द्यासह हिंदुत्त्वाची स्वीकारलेली भूमिका यामुळे राज ठाकरे अयोध्या वारी करणार का असा प्रश्न वारंवार विचारण्यात येत होते. या प्रश्नांची उत्तर देण्याची तयारी पक्षाने सुरु केल्याचं समजतं. बाळा नांदगावकर यांच्या माहितीनुसार, राज ठाकरे १ ते ९ मार्च दरम्यान अयोध्येचा दौरा करणार आहेत.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षाच्या बैठकीमध्ये भविष्यातील वाटचालीबाबत भाष्य केलं. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये ज्यांना राजकीय आकांक्षा नसतात, पण शहराचा विकास व्हावा, असं वाटतं त्यांना संधी दिली जाणार आहे. अशा लोकांना शहर रक्षण ही उपमा दिली जाईल, तसंच गटाध्यक्षाला राजदूत म्हणून संबोधलं जाईल, असं मनसेकडून सांगण्यात आलं आहे.
मराठी भाषा दिनाला मनसेकडून मराठी स्वाक्षरी मोहीम
२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन मनसे साजरा करणार आहे. यासाठी मराठी स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे. राज ठाकरे स्वत: यासाठी मराठी स्वाक्षरी करणार आहेत. यादिवशी मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे. मराठी पुस्तकं, साहित्यिक, खेळाडू, प्रकाशक यांचा गौरव करण्यात येणार असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.
याआधी मागच्यावर्षी निवडणुकांआधी आणि निवडणुकांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील अयोध्येत गेले होते. निवडणुकांआधी पहिले मंदिर फिर सरकार, अशी घोषणा शिवसेनेनं दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर गेले होते.















