मुंबई (वृत्तसंस्था) मनसेच्या २ कार्यकर्ते महापालिकेच्या परिवहन सेवेच्या लोकार्पण सोहळ्यात घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी दोघा मनसे कार्यकर्त्यांना या वेळी चोप देत, कार्यक्रमातून बाहेर काढल्याचा प्रकार घडला होता. याचदरम्यान पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांची विचारपूस करुन ज्या गालावर पोलिसांनी मारलं, त्याच गालावर प्रेमाचा हात फिरवल्याचे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून वसई-विरार येथे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला, वसई-विरार महापालिका क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयुक्त भेट देत नाहीत, म्हणून मनसेच्या २ कार्यकर्ते महापालिकेच्या परिवहन सेवेच्या लोकार्पण सोहळ्यात घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी दोघा मनसे कार्यकर्त्यांना या वेळी चोप देत, कार्यक्रमातून बाहेर काढल्याचा प्रकार घडला होता. गेल्या ६ महिन्यापासून पत्र व्यवहार आणि संपर्क साधूनही वसई-विरार पालिका आयुक्त वेळ देत नसल्याने आंदोलन केल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं. मात्र आंदोलनादरम्यान तिथे बंदोबस्ताला हजर असणाऱ्या पोलीस निरीक्षण राजेंद्र कांबळे यांनी मारहाण आणि आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप मनसेकडून केला जात आहे. तसेच त्याबाबत काही व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रात दरदिवशी विविष विषयांवर ठिकठिकाणी अनेक संघटना, पक्षांकडून शेकडो आंदोलन होत असतात, अशी आंदोलन हाताळण्याची एक पद्धत आहे व नियम आहेत, परंतु वसई-विरारमध्ये घडलेला प्रकार कोणत्याही राजकीय पक्षाच्या, संघटनेच्या किंवा राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत घडणे योग्य नाही, पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी हाताळलेले आंदोलन महाराष्ट्राच्या गृह खात्याला शोभा देणारे नसून अत्यंत घृणास्पद आहे असा आरोप आमदार राजू पाटील यांनी केला.