नवी मुंबई (वृत्तसंस्था) प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे जामीन घेण्यासाठी आज वाशी न्यायालयात हजर राहणार आहेत. या खटल्यात सुनावणीला सुरुवात करण्यासाठी त्यांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने काढले होते. त्यानुसार शनिवारी राज ठाकरे वाशी न्यायालयात हजर राहून जामीन घेणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज वाशी कोर्टात हजर राहणार आहेत. २६ जानेवारी २०१४ रोजी राज ठाकरे यांनी वाशी येथे केलेल्या भाषणात टोल नाके बंद करण्याचे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे आणि मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका इथे तोडफोड केली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी राज ठाकरे हे वाशी कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. राज ठाकरे हे कोर्टात हजर राहीले नसल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले होते. आज सकाळी १० ते १०.३० दरम्यान राज ठाकरे वाशी टोल नाका इथे पोहचणार आहेत. त्यानंतर ११ पर्यंत राज ठाकरे हे वाशी कोर्टात हजर राहणार आहेत.