जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानमध्ये विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (budget session) सुरू आहे. अधिवेशनात चर्चेदरम्यान अशोक गेहलोत यांच्या सरकारमधील मंत्री महोदयांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. मंत्री शांतीकुमार धारिवाल यांनी राज्यातील अत्याचारासंदर्भात माहिती देताना म्हटलं की, राजस्थान हे राज्य बलात्कारात पहिल्या क्रमांकावर आहे. याच्या कारणांवर बोलताना धारीवाल म्हणतात, काय करणार राजस्थान पुरुषांची भूमी आहे.
धारिवाल यांनी विधानसभेत अत्याचार आणि कारागृह यासंदर्भात माहिती देताना म्हटलं की, आपण जर बलात्काराचे प्रकरणं पाहिले तर ते हत्येचे आकडे दिसतायेत. बलात्कार आणि हत्येत राजस्थान 11व्या क्रमांकावर आहे. तर उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेश दुसऱ्या, आसाम तिसऱ्या आणि महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर ओडीशा, तर आठव्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे. राजस्थान बलात्काराच्या प्रकरणात क्रमांक एकवर आहे. दोनवर उत्तर प्रदेश आणि क्रमांक तीनवर मध्य प्रदेश आहे.
मंत्री शातीकुमार धारिवाल जेव्हा विधानसभेत माहिती देत होते. त्यावेळी सभागृहातील मंत्र्यांना गांभीर्याचं जराही भान नव्हतं. धारीवाल यांनी जेव्हा बलात्कारच्या प्रकरणाचा संबंध पुरुषांच्या भूमीशी जोडला तेव्हा कुणालाही चूक झाल्याचं लक्षात आलं नाही. त्याचवेळी सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदारांसह विरोधक देखील हसत राहिले. विशेष म्हणजे गेहलोत सरकारमध्ये तीन-तीन महिला मंत्री देखील आहेत. त्यामधील एकाही महिला मंत्र्यांना धारिवाल यांना टोकता आलं नाही.
वाद वाढल्यानंतर स्पष्टीकरण
दरम्यान, वाद वाढल्यानंतर शांतीकुमार धारिवाल यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की, मी महिलांचा सन्मान करतो. मी माझ्या वक्तव्यावर विधानसभेत माफी मागणार आहे.