जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महानगरपालिकेच्या बहुचर्चित स्थायी समिती सभापतीपदी राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे. स्थायी समिती सभापतीपदी राजेंद्र घुगे पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे नितीन बरडे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांनी माघार घेतल्यामुळे पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.
राजेंद्र पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे नितीन बरडे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांनी माघार घेतल्यामुळे सभागृहात त्यांची बिनविरोध निवड झाली. याचबरोबर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी रंजना भरत सपकाळे यांचा एकमेव अर्ज आलेला आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड दुपारी जाहीर होणार आहे. महानगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीसाठी सभा घेण्यात आली आणि सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत तसेच आयुक्त सतीश कुलकर्णी नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.
स्थायी समितीचे सदस्य ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी नितीन बरडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमची सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवसेनेचे वरिष्ठ नितीन लढ्ढा,विरोधी पक्षनेते सुनील महाजन, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपस्थित होते. जळगाव शहराच्या विकासासाठी माघार घ्यावी अशी विनंती केल्यामुळे मी या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत माघार घेतली आहे असेही बरडे यांनी सांगितले.
















