मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभेची निवडणुकीचा गुलाल आम्हीच उधळणार, असा विजयाचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
राज्यसभेच्या सहा जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आज ३.३० वाजेपर्यंत विधानसभेच्या २८५ सदस्यांनी मतदान केले आहे. आज मतदानावेळी भाजपचे पोलिंग एजंट पराग अळवणी यांनी जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांची मतं बाद करण्याची मागणी केली आहे. भाजपने आतापर्यंत तीन मतांवर आक्षेप घेतला आहे. भाजपने आक्षेप घेतलेल्या मतांमध्ये सुहास कांदे, जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या नावाचा सामावेश आहे.तसेच काँग्रेसचे आमदार अमर राजुरकर यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विधानभवनातून घरी निघाले. त्यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विजयाचा गुलाल उधळणार का असा प्रश्न केला. त्यावेळी ‘गुलाल आम्हीच उधळणार’, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.