पहुर, ता. जामनेर (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या लोंढरी शिवारातील कपाशीच्या शेतात पहूर येथील येथील अविवाहित तरुणाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना १२ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.
पहुर पेठच्या आंबेडकर नगरमधील रहिवासी आनंदा सांडू मोरे यांचा लहान मुलगा समाधान आनंदा मोरे (वय ३४) व त्याची बहीण आशा मोरे तसेच चुलत बहीण सारिका खराटे व मंजुळा घोडेस्वार हे लोंद्री खुर्द शिवारातील शेतात बेलाची पाने घेण्यासाठी पहाटे पाच वाजता पोहोचले. शेतात काही वीजतारा जमिनीवर आहेत. शेतात कपाशीमध्ये वीज तार तुटलेली होती. तीनही जण नेहमीप्रमाणे बेलाची पान तोडण्यासाठी जात असताना वाटेत तुटलेल्या वीजेच्या तारेवर आशाबाई मोरे यांचा पाय पडला. हे पाहुन आशाबाई यांना वाचवण्यासाठी समाधान मोरे याने बहिणीला उचलून बाजूला करीत तिला वाचविले. पण समाधान याचा तोल गेल्लायामुळे त्याच्याही पायांना वीजतारांचा स्पर्श झाला. त्यामुळे विजेच्या जबर धक्क्याने समाधानचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत समाधान मोरे याला पहुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, तपासणी करुन डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले… समाधान मोरे याचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने पहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत समाधान मोरे यांच्या पश्चात आई- वडील, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. याबाबत पहुर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, समाधान मोरे यांच्या मृत्यूस वीज कंपनीचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु होती.