जळगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार) पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7.15 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मोदींसोबत एकूण 18 मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. त्यात खान्देशातून रावेर लोकसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा विजयी होणाऱ्या रक्षाताई खडसे यांना देखील मंत्रीपदाची लॉटरी लागली असल्याची माहिती समोर येत आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी एनडीएच्या सर्वच घटक पक्षांना संधी देण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला सर्वाधिक मंत्रीपदे मिळणार असल्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रालाही महत्त्वाची मंत्रीपदे दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. केंद्रीय मंत्रीपदासाठी भाजपकडून राज्यातील चार खासदारांची नावे चर्चेत आहे. नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे आणि रक्षाताई खडसे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत होती. खान्देशातून रक्षा खडसे यांना मंत्रिपदासाठी दिल्लीतून फोन आल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे.
दरम्यान, रक्षा खडसे यांना राज्यमंत्री दिले जाणार असल्याचे देखील वृत्त आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा खडसे परिवारात मंत्रीपद मिळणार आहे. भाजपमध्ये कुठं तरी बाजू सारला गेलेला खडसे परिवार पुन्हा एकदा मूळ भाजपच्या मूळ प्रवाहात येतांना दिसत आहे.