वाराणसी (वृत्तसंस्था) न्यायमूर्ती हा कोणत्याही धमार्चा, जातीचा वा भाषेचा नसतो. त्याच्यासाठी संविधान हेच जात, धर्म आणि भाषा असते. त्यामुळेच राम जन्मभूमी खटल्यात जो निकाल देण्यात आला तो माझा किंवा कुणा एका न्यायाधीशाचा नाही तर तो निकाल सर्वोच्च न्यायालयाचा आहे. धर्माच्या आधारावर नाही तर कायदे आणि संविधान याच्या आधारावर हा निकाल दिला गेला आहे, असे माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी सांगितले.
वाराणसी केदारघाट येथील करपात्री धाम येथे एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रंजन गोगोई उपस्थित होते. यावेळी राम जन्मभूमी खटल्याच्या निकालावर ते बोलले. ते म्हणाले,’ न्यायमूर्ती हा कोणत्याही धर्माचा, जातीचा वा भाषेचा नसतो. त्याच्यासाठी संविधान हेच जात, धर्म आणि भाषा असते. त्यामुळेच राम जन्मभूमी खटल्यात जो निकाल देण्यात आला तो माझा किंवा कुणा एका न्यायाधीशाचा नाही तर तो निकाल सुप्रीम कोर्टाचा आहे. पाच न्यायाधीशांच्या पीठाने तीन ते चार महिन्यांच्या सुनावणीनंतर ९०० पानांचा हा निकाल दिला. हा निकाल म्हणजे सुप्रीम कोर्टाचे एक मत आहे. त्यात कोणताही भेदभाव नाही. धर्माच्या आधारावर नाही तर कायदे आणि संविधान याच्या आधारावर हा निकाल दिला गेला आहे.’
न्यायदानाच्या प्रक्रियेवरही रंजन गोगोई यांनी महत्त्वाचे मत मांडले. न्यायमूर्ती हजारो खटले निकाली काढत असतात. त्यांनी दिलेला निकाल एका पक्षकाराच्या बाजूने जाणारा तर दुसऱ्या पक्षकाराच्या विरोधात जाणारा असतो. असे असले तरी निकाल कोणाच्या बाजूने गेला याच्याशी न्यायमूर्तीला काहीही देणेघेणे नसते. न्यायमूर्तीच्या खुर्चीत बसल्यावर पूर्वग्रह ठेवून काम करता येत नाही. जो काही निवाडा करायचा तो कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच करावा लागतो, असे गोगोई म्हणाले. यावेळी स्वामी अभिषेक ब्रह्मचारी यांनी रंजन गोगोई यांचे कौतुक केले व भारतवर्ष आणि सनातन धर्म आपला सदैव ऋणी राहील, असे सांगितले.