जळगाव (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील पाडळसे येथील भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसेचे कुटूंबप्रमुख रमेश विठू पाटील यांचे गुरूवार दि.८ ऑगष्ट रोजी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि.९ रोजी सकाळी ९ वाजता पाडळसे येथील राहत्या घरापासून निघणार आहे.
रमेशदादा पाटील यांच्याकडे वंश परंपरागत पध्दतीने १९६९ साली लेवा पंचायतीच्या कुटूंबनायक पदाची धुरा मिळाली. त्यांनी या पदावर ५५ वर्ष काम करत समाजातील कौटुंबिक कलहाचा न्याय निवाडा करण्याचे काम केले. अनेक कुटुंबात असलेले वितुष्ट दुर करत त्यांनी मनोमिलन घडवून आणले होते. रमेशदादा पाटील यांच्या रूपाने लेवा पाटील समाजाचे एक महनीय व्यक्तीमत्व काळाच्या पडद्या आड गेले आहे. कुटूंबनायक रमेशदादा हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. अलीकडच्या काळात पंचायतीच्या कार्याध्यक्षपदाची धुरा त्यांचे चिरंजीव ललित पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली होती.