मुंबई (वृत्तसंस्था) रागाने घरातून बाहेर पडलेल्या मुलासोबत एका नराधमाने ४ महिन्यात ३ वेळा लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
चेंबूर परिसरात राहणाऱ्या ११ वर्षीय पिडीत बालकाने १ जानेवारी रोजी रागाने घर सोडले होते. त्यानंतर रस्त्यावर भटकत असताना त्याच्यावर भूपेंद्र गोपीया (४२) या नराधमाची नजर पडली. यानंतर त्याने पिडीत मुलाला सोबत घेत चेंबूरमध्ये विविध ठिकाणी नेत त्याच्यावर अत्याचार केलेत. तसेच त्याला याबाबत कुणाला काहीही सांगितल्यास जीवेठार मारण्याची धमकी दिली. एकेदिवशी पिडीत मुलाने त्याच्या तावडीतून पळ काढला आणि घरी परतला. यानंतर घडलेला प्रकार त्याने वडिलांना सांगितला. वडिलांनी लागलीच पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी गोपीया याला अटक केली. दरम्यान, अवघ्या ११ वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.