अमरावती (वृत्तसंस्था) भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना पाकिस्तान आणि चीनमधून मदत मिळत आहे, असं बेताल वक्तव्य केलं आहे. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. शेतकऱ्यांबद्दल दानवे अशा पद्धतीनं बोलत असतील तर त्यांचा डीएनए हिंदुस्थानी आहे की पाकिस्तानी हे तपासावे लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं असून शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही असंही ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. “सर्व देशभरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून पाठिंबा मिळत आहे. अशामध्ये शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे म्हणणं शेतकऱ्याचा अपमान आहे. रावसाहेब दानवेच हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी डीएनए तपासणं गरजेचं आहे,” असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांनी सांगितलं की, आम्ही दानवे यांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं. आता दानवे यांच्या घरात घुसून त्यांना मारावं लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बच्चू कडू हे सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली मार्गावर आहेत.
“हे आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?,” असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. “त्यांना वाटलं हे यशस्वी होणार नाही. यामुळे आता शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं सांगत आहेत. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत.