साकळी (प्रतिनिधी) विधायक कार्य हेच प्रगतीचे द्योतक असते. माणसाने माणसाच्या कामी येणे हे कोरोनाने सर्वांना शिकवल्याने यापुढे माणुसकी वाढीस लागेल असे जीवन जगावे व कोरोना संक्रमण काळ अजूनही सुरूच असल्याने समाज निकोप राहण्यासाठी सर्वांनी मास्क लावणे, अंतर ठेवणे व सतत स्वच्छता राखत जास्तीची काळजी घ्यावी असा मौलिक सल्ला आ.शिरिष चौधरी यांनी दिला आहे.
दिवाळीनिमित्त १४ नोव्हेंबर रोजी निंभोरा ता.रावेर येथे आ. शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राष्ट्रसंत गाडगेबाबा कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. जनसंग्राम संघटनेचे संस्थापक व निंभोरा माजी उपसरपंच विवेक ठाकरे, फ्रुटसेल सोसायटीचे चेअरमन प्रल्हाद बोंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर सोनवणे, नामदेव खंडू पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर पुना भंगाळे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनीलभाऊ कोंडे, सुनील कोळंबे, ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे, शकील खाटीक, शहजाद शेख, किरण सपकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामपंचायतीचे प्रशासक जी.एम.खेकारे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या, डॉ.मोनिका चौधरी, तलाठी समीर तडवी, ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील, गट प्रवर्तक सौ.दीपाली कोळंबे, सौ.विद्या शिंपी, औषध निर्माता रवींद्र रामदास महाजन यांच्या मार्गदर्शनात कोरोना काळात विधायक कार्य केलेल्या गावातील खऱ्या लोकसेवकांना कोरोना सन्मान देण्यात आला. यात सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस,आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, पोलीस कर्मचारी, विद्युत मंडळ कर्मचारी, तलाठी, मेडिकल चालक अशा एकूण ११५ जणांचा सन्मानपत्र, कपडे व मिठाई देऊन भव्य सत्कार करण्यात आला. निंभोरा ग्रामस्थ व विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गावातील स्व.चञभुज रामचंद्र खाचणे, स्व.कडू हरी भंगाळे, स्व.सुरेंद्र जगन्नाथ नेहते, स्व.दगडू उखा भारंबे, स्व.माजी सैनिक सुधाकर गंजी सोनवणे व युवा शेतकरी स्व.महेश सुधाकर भंगाळे यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जनसंग्रामचे राज्य समन्वयक वाय.डी. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.प्रा.दिलीप सोनवणे व कु.धनश्री ठाकरे यांनी सूत्रसंचालन तर दिलशाद शेख यांनी आभार मानले. हबीब खान, तबीब खान, मुज्जफर पटेल, मनोज भंगाळे, दस्तगिर खाटीक, निलेश भंगाळे, श्रुती भंगाळे, राज खाटीक, शकील शेख दगडू, पियुष बऱ्हाटे, गौरव ठाकरे यांच्यासह जनसंग्राम बहुजन लोकमंच सामाजिक संघटना व ठाकरे मित्रपरिवाराने कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.