नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वरिष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी अखेर NDTV इंडिया या वृत्तवाहिनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
‘न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड’ अर्थात एनडीटीव्ही या वृत्त प्रसारण वाहिनीचे संस्थापक-प्रवर्तक प्रणॉय आणि राधिका रॉय यांनी प्रवर्तक कंपनी ‘आरआरपीआर होल्डिंग्ज’ म्हणजेच आरआरपीआरएचच्या प्रवर्तक (प्रमोटर) पदाचा राजीनामा दिल्यानंतर एनडीटीव्हीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक, पत्रकार रवीश कुमार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीनं देखील त्यांचा राजीनामा स्विकारला असून तो तात्काळ प्रभावानं लागू होईल असं सांगितलं आहे. दरम्यान, एनडीटीव्हीची मालकी अदानी समूहाकडे आल्यानंतर एनडीटीव्हीच्या संचालक मंडळातून प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता रवीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. रवीश कुमार हे गेल्या दोन दशकांपासून एनडीटीव्हीशी संलग्न आहेत. त्यांना पत्रकारितेसाठी रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.















