रावेर (प्रतिनिधी) शेतातून घरी आल्यावर पत्नी शेजाऱ्यासोबत नको त्या अवस्थेत सापडली. यानंतर संतप्त झालेल्या पतीने शेजारच्याला दारू पिण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी बोलावलं आणि त्याच ठिकाणी त्याच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून केला. संजय रेमसिंग पावरा (वय ३०, रा. सायबुपाडा ता. रावेर) असं मृत तरुणाचं तर किनेश सजन पावरा (वय २८) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील सायबुपाडा येथील सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या आदिवासी तरुणाचा दुसऱ्या दिवशी गावापासून काही अंतरावर एका नाल्यात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दगडाने डोके ठेचून तरुणाचा निघृणपणे खून केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी शनिवारी रावेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रावेर पोलीस स्थानकचे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला वेग दिला. पोलिसांनी तपासचक्र फिरवल्यानंतर मयताचे नाव संजय पावरा असल्याचे समोर आले होते. परंतू संजयचा खून कुणी आणि का केला?, हे मात्र कळत नव्हते. यामुळे पोलिसांनी मयताचे फोन रेकॉर्ड तपासायला सुरुवात केली. मयत संजय याचं शेवटचं फोनवर संशयित किनेश पावरा याच्यासोबत बोलणं झालं होतं. त्यानुसार रावेर पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने संशयित किनेश पावरा यास ताब्यात घेऊन चौकशी करायला सुरुवात केली.
सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या किसनला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानुसार मयत आणि संशयित हे दोघेही एकाच ठिकाणी एकमेकांच्या शेजारी राहतात. मयत संजय याचे किनेश याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. घटनेच्या एक ते दोन दिवसांपूर्वी किनेश याने त्याच्या पत्नीसोबत संजय यास रंगेहाथ पकडले होते, त्याचा राग किनेश याच्या डोक्यात होता. त्यानुसार ७ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास किनेश याने संजय यास फोन केला, तुला भेटून बोलायचे आहे, सोबत दारू पिऊ, असे सांगत बोलावले. संजय गेला, याठिकाणी दोघांनी सोबत मद्यप्राशन केलं, यावेळी किनेशचा डोक्यात असलेला राग उफाळून आला व त्याने संजय याचा डोक्यात दगड टाकून खून केला, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. घटनेचा पुढील पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे हे करीत आहेत.
पोलीस उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक कैलास नगरे, पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे, कल्पेश अमोदकर, किशोर सपकाळे, सचिन घुगे, मनोज काटे, सुकेश तडवी, प्रमोद पाटील, विकार शेख, अमोल जाधव, उमेश नरवाडे, दिपक ठाकूर, मुकेश मेढे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे नितीन बाविस्कर, महेश महाजन, ईश्वर पाटील, संदीप सावळे, भारत पाटील, मोतीलाल चौधरी यांच्या पथकाने अवघ्या २४ तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला आहे.