मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारनं काही जिल्ह्यातील निर्बंध शिथील केल्यानंतर आता मुंबई लोकल ट्रेन कधी सुरू होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई लोकलसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. लोकलबाबत राज्य सरकारने लोकांच्या मागण्यांचा विचार करावा. राज्य सरकार तयारी दाखवेल त्याक्षणी लोकलला परवानगी द्यायला तयार असल्याचं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
‘राज्यानं सध्या काही जिल्ह्यात कोरोना निर्बंध शिथील केले आहेत, त्याचा आधार घेऊन लोकल पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याबाबत राज्य सरकार केंद्राला कळवू शकतं. राज्यात आता कोरोना संसर्ग कमी झालाय. त्यामुळं कर्मचारी, नागरिक व अन्य व्यावसायिकांच्या प्रवासाच्या दृष्टीनं रेल्वे पूर्ववत सुरू व्हावी, अशी विनंती राज्यानं केंद्र सरकारकडं केल्यास आम्हाला काहीच अडचण नाही. मात्र, जोपर्यंत राज्य सरकार आपली भूमिका जाहीर करत नाही, तोपर्यंत केंद्र सरकार स्वत:हून या विषयात हस्तक्षेप करणार नाही. कारण, शेवटी कोरोनाची स्थिती राज्य सरकार हाताळत आहे,’ असं दानवे म्हणाले. ‘राज्य सरकारनं त्यांचा निर्णय कळवल्यास आम्ही तातडीनं पुढील कार्यवाही करू,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कोरोनाचे निर्बंध कितीही शिथील झाले तरी मुंबईतील लोकल सेवा जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत मुंबईत खऱ्या अर्थानं अनलॉक होणार नाही. अर्थचक्र रुळावर येणार नाही, अशी स्थिती आहे. मागील वर्षी लॉकडाऊन लागल्यापासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली मुंबईतील लोकल दीड वर्षानंतरही पूर्णपणे सुरू झालेली नाही. मधल्या काळात आधी महिलांना ठराविक वेळेत लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर काही निर्बंधांसह सर्वसामान्यांनाही परवानगी देण्यात आली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा प्रवासबंदी लादण्यात आली. ती आजपर्यंत कायम आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. खासगी बँक कर्मचारी, पत्रकार, वकिलांनाही ती मुभा नाही. त्यामुळं सर्वसामान्यांबरोबरच या घटकांमध्येही अस्वस्थता आहे.