अमळनेर (प्रतिनिधी) शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत ४ रस्त्यांना सुमारे ७० कोटींच्या निधीस मंजुरी असली तरी आधी नगरपालिकेला १० कोटी स्वनिधी भरावा लागणार आहे. त्यामुळे आधिच आर्थिकदृष्टया नगरपालिका सक्षम नसल्याने या रस्ते विकास प्रकल्पावर पुनर्विचार करणे गरजेचे असल्याचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे कळवले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत अमळनेर नगर परिषदेला ४ रस्ते विकास निधीसाठी ७० कोटी रुपये मंजूर केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला प्रशासकीय मान्यता ही दिली आहे. यात पालिका हद्दीतील ४ रस्त्यात राज्य मार्ग १५ ते ओमशांती भवनपर्यंत, राज्य मार्ग १५ ते गलवाडेपर्यत, विप्रो ते न.पा. आणि धुळे रोड- तुळजाई हॉस्पिटल ते पिंपळे रोड या रस्त्यांच्या काँक्रीटकरणाचा समावेश आहे. या रस्त्यांमुळे शहरातील विविध कॉलन्या एकमेकांना जोडल्या जाणार आहेत. तसेच अनेक वर्षांपासून नागरिक कर भरत असताना ही त्यांना रस्त्यांची सुविधा नव्हती. तर हे रस्ते झाल्याने त्यांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे. यासाठी एकुण ७० कोटी कामात ८५ टक्के म्हणजे ६० कोटी राज्य शासन तर १५ टक्के म्हणजे १० कोटी पालिकेला स्वनिधी म्हणून आधी रक्कम बँकेत जमा करावी लागणार आहे.
दरम्यान, माजी आमदार साहेबराव पाटील यांनी अमळनेर नगर परिषदेला पाठविलेल्या पत्रात, पालिकेला पाणीपुरवठा वीज देयक पोटी २५ कोटी, जलसंपदा पाणी पुरवठयाचे २ कोटी, पालिकेच्या पाणीपुरवठ्याचे थकीत कर्ज ४ कोटी, पालिकेच्या कर्मचारी प्रलंबित देयके ८ कोटी, प्रलंबित दावे पोटी १५ कोटी आणि अपरिहार्य खर्चासाठी ६ कोटी असे मिळून सुमारे ६१ कोटीची पालिकेला गरज आहे. असे असतांना पुन्हा रस्ते विकासाला १० कोटी म्हणजे नगरपरिषदेवर प्रचंड आर्थिक बोझा पडणार आहे. एकंदरीत नगर परिषद आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने व्यापक जनहिताच्या दृष्टीने सदविवेक बुद्धीने विचार करून ४ रस्ते विकास प्रकल्प नाकारावा, असे साहेबराव पाटील यांनी पत्रात म्हटले आहे या पत्राच्या प्रती त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह नगरविकास विभागाला पाठवल्या आहेत.