जळगाव (प्रतिनिधी) मराठवाड्यात धुव्वाधार पाऊस सुरू असताना आता जिल्ह्यात देखील पावसाने काही भागात तडाखा दिला आहे. काल दिवसभर कुठे जोरदार तर कुठे पावसाची रिपरिप सुरू आहे. रविवार व सोमवारी जिल्हयात पावसाचा ‘रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात या दोन दिवसात विजेच्या गडगडाटासह मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी ६ ते सोमवारी सकाळी ६ या काळात सर्वाधिक पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तर सोमवारी सकाळनंतर पावसाची तिव्रता कमी होईल. जिल्ह्यात रेड अलर्ट असल्याने आज जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत आपत्कालीन परिस्थीती उत्भवल्यास सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. जिल्हयात काल दिवसभरात शहरात पावसाची रिपरिप तर दुपारच्या वेळी जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.
















