नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सेंटर फॉर मॉनिटरिंग इकोनॉमिने दिलेल्या अहवालानुसार भारतातील बेरोजगारीचा दर घसरला असून तो ६.५७ टक्क्यांवर पोहोचला आहे. महाराष्ट्रात बेरोजगारी दर ४.२ तर हरियाणात सर्वाधिक जास्त २४.४ टक्के आहे. मार्च २०२१ नंतर हा सर्वाधिक घसरलेला दर आहे.
जानेवारीमधील बेरोजगारीचा ६.५७ टक्के दर हा मार्च २०२१ नंतरचा सर्वात कमी दर आहे. कोरोनाची लाट, नंतर आलेले ओमायक्रॉन व्हेरियंटचे संकट यातून भारतीय अर्थव्यवस्था सावरत असून त्याचा परिणाम म्हणजे बेरोजगारीचा दर कमी झाल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील जानेवारी महिन्यातील बेरोजगारीचा दर हा ४.२ टक्के इतका आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२२ मध्ये देशातील शहरी भागात बेरोजगारीचा दर हा ८.१६ टक्के इतका आहे तर ग्रामीण भागातील हा दर ५.८४ टक्के इतका आहे. डिसेंबर २०२१ मध्ये देशातील बेरोजगारीचा दर हा ७.९१ टक्के इतका होता. डिसेंबर २०२१ मध्ये बेरोजगारीचा दर हा शहरी भागात ९.३० टक्के आणि ग्रामीण भागात ७.२८ टक्के इतका होता.
बेरोजगारीच्या प्रमाणाचा विचार करता तो तेलंगणा (०.७ टक्के) राज्यात सर्वात कमी आहे तर हरयाणामध्ये (२३.४) तो सर्वाधिक आहे. गुजरातमध्ये हा दर १.२ टक्के, मेघालयमध्ये १.५ टक्के ओडिशामध्ये १.८ टक्के तर राजस्थानमध्ये १८.९ टक्के इतका आहे. डिसेंबर महिन्यामध्ये एकूण ५३ दशलक्ष इतके बेरोजगार लोक होते आणि त्यापैकी महिलांची संख्या ही मोठी होती असं CMIE ने आपल्या अहवालात म्हटलं आहे.