हिंगोली (वृत्तसंस्था) सोबत राहत असूनही लग्नाला नकार देत असल्यामुळे एका तृतीयपंथीयाने तरुणाचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना हिंगोलीत घडली आहे. अशोक आठवले अशोक गजानन (वय २३, रा. नवलगव्हाण, ता. हिंगोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (३१ मार्च) गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात अधिक असे की, हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण येथील अशोक हिंगोलीत मागील काही वर्षांपासून रिक्षा चालवत होता. तीन महिन्यांपूर्वी अशोक हिंगोलीतील खुशालनगरमध्ये राहण्यासाठी आला होता. या ठिकाणी अशोकची प्रिया निरसिंग तुरमळू ऊर्फ दीपक नरसिंग तुरमळू या तृतीयपंथीयाशी ओळख झाली. त्यामुळे अशोक तिच्याकडेच राहत होता.
गुरुवारी (३० मार्च) रोजी प्रियाने अशोकला तू माझ्यासोबत लग्न कर असा तगादा लावला. मात्र अशोकने नकार दिला. त्यामुळे संतापाच्या भरात प्रियाने शेख जावेद याच्याशी संगनमत करून अशोकचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने गळफास घेतल्याचा बनाव करून त्याला उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतू या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी प्रिया ऊर्फ दीपक व शेख जावेद या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















