धरणगाव (प्रतिनिधी) धावडा तसेच पिंप्री येथे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. दोघंही ठिकाणी युद्ध पातळीवर काम सुरु असून लवकरच धरणगावला नियमित आणि शुद्ध पाणी पुरवठा सुरु होणार असून अवघे पाच ते सहा दिवस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.
निलेश चौधरी म्हणाले की, धावडा येथील मुख्य पाईप लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. हा गाळ काढण्याचे काम पुणे येथील एका कंपनीला देण्यात आले आहे. पाईप लाईनमध्ये एकावेळी एकच व्यक्ती आत जाऊन गाळ काढू शकतो. त्यामुळे गाळ काढण्यात वेळ लागत आहे. साधारण ४५०/५०० फुटची पाईप लाईन सुरळीत करायची आहे. पुढील आठवडा भरात धावडा ते धरणगावची पाईप लाईनमधून पाणी पुरवठा सुरळीत होईल. मागील काही दिवसापासून गाळ काढण्याचे काम सुरु असल्यामुळे पिंप्री येथील शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. पिंप्री ते धरणगाव फिल्टर प्लांट अशी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. दुसरीकडे पाणी पुरवठ्याची समस्या उद्भवल्या बरोबर शहरात जनजागृती करण्यात अली होती. पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. धरणगावचे नागरिक सुज्ञ असून योग्य ती काळजी घेण्याचे काम करत आहेत. पाण्यात एका विविष्ट मर्यादेपर्यंतच टीसीएल पावडर तसेच आलम टाकता येते. मर्यादेबाहेर टाकले गेल्यास नागरिकांना विविध आरोग्याच्या समस्या निर्माण होवू शकतात. त्यामुळे टीसीएल पावडर तसेच आलमचा वापर निर्धारित मर्यादेतच करावा लागतो. दरम्यान, धरणगावतील सुज्ञ नागरिकांनी पालिकेची तांत्रिक अडचण लक्षात घेता, प्रशासनाला आणखी पाच-सहा दिवस सहकार्य करावे, असे भावनिक आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे. दुसरीकडे धरणगाव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी संपूर्ण गावात नवीन पाईप लाईन टाकावी लागणार आहे. शहरातील पाणी पुरवठा नियमित करण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री तथा विद्यमान आमदार गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून पाइपलाइनचे काम युद्ध पातळीवर करण्याचे नियोजन सुरु आहे. जेणे करून लवकरात लवकर शहराला नियमित पाणी पुरवठा होईल. शहरातील पाणी पुरवठ्यासाठी खास वेळापत्रक तयार करून वेळापत्रकानुसार संपूर्ण गावात पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरु आहे. त्यामुळे पाणी पुरवठा पूर्ण दाबाने होईल आणि नागरिकांना पाण्याची मोटार लावावी लागणार नाही. यामुळे विजेची बचत होत, नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही, असेही श्री. चौधरी यांनी सांगितले आहे.