धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील चिंतामणी मोरया परिसरातील धाडसी चोरीचा प्रकार समोर आला आहे. आनोरे येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. एच. चौधरी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी हातसफाई केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्याध्यापक एल. एच. चौधरी हे काही कामानिमित्त मुंबई येथे गेल्याने घर रिकामे होते. हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. चोरीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले. प्राथमिक तपासानुसार चोरट्यांनी चार तोळे सोने लंपास केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, चोरीचा नेमका आकडा आणि आणखी काही साहित्य चोरीला गेले आहे का?, याची स्पष्टता मुख्याध्यापक चौधरी हे मुंबईहून परत आल्यानंतरच होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पवन देसले आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने घराची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकाची मदत घेतली जाणार आहे. या घटनेचा पुढील तपास धरणगाव पोलीस करत आहेत. चोरट्यांचा लवकरच माग काढण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. चोरीच्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.