पुणे (वृत्तसंस्था) जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संदर्भात होत असलेले आरोप आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या चौकशीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य करत आरोप फेटाळून लावले आहे. साखर कारखान्यांच्या संदर्भातील खोटी आकडेवारी देऊन आरोप केले जात असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तसेच अजित पवारांनी राज्यातील विकल्या गेलेल्या कारखान्यांची भलीमोठी यादीच वाचून दाखवली.
अजित पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील साखर कारखानादारीबद्दल अनेक बातम्या आल्या. मी अनेकदा उत्तर देणं टाळलं. वस्तुस्थिती समोर यावी म्हणून आज बोलत आहे. एसीबी, पोलिस आणि सहकार विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी केली, मात्र त्यात काहीही निष्पन्न झालं नाही. साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप केले जात आहेत, २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार हा खोटा आरोप आहे, असंही अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांनी राज्यातील विकल्या गेलेल्या कारखान्यांची भलीमोठी यादीच वाचून दाखवली. त्यांनी कारखाने विक्रीच्या व्यवहाराचे रकमांसह वाचन करुन दाखवलं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एकूण ३० कारखाने विकले असल्याची यादी अजित पवारांनी सांगितलं.
अजित पवारांनी सांगितलं की, राज्य शिखर बँकेने राज्यातील वेगवेगळे ३० सहकारी साखर कारखाने विकले. सहा सहकारी साखर कारखाने जिल्हा मध्यवर्ती बँकानी विकले. सहा सहकारी साखर कारखाने राज्य सरकारच्या परवानगीने विकण्यात आले. तीन सहकारी साखर कारखाने कारखान्यांनी स्वतः विकले. बारा सहकारी साखर कारखाने भाडेकरारावर किंवा सहयोगी करारावर चालवण्यास देण्यात आलेत, अशी माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रातील ६४ सहकारी साखर कारखाने विकत घेतले गेलेत किंवा एकाने विकत घेऊन दुसऱ्याला चालवायला दिलेत किंवा भाडेकरारावर चालवले जात आहेत, असं अजित पवार म्हणाले.
जरंडेश्वर साखर कारखान्याबाबबत सतत माझ्या कुटुंबांचा सतत उल्लेख केला जातो. मला लोकांना सांगायचंय की मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा बॅंकेने जरंडेश्वर साखर कारखान्याने थकलेले पैसै न भरल्याने कारखान्याचा ताबा घेतला. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीमध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही असं सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी म्हटलं आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. अजित पवार म्हणाले की, नियम सर्वांना सारखेच आहेत. आज सगळी कागदपत्रं घेऊन आलो आहे, असं ते सुरुवातीला म्हणाले. ड्रग्ज प्रकरणात कुणाचाही मुलगा असेल तर त्यावर कारवाई करा, असंही ते म्हणाले.