रावेर (प्रतिनिधी) रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यातील माळी समाज पंच मंडळानेही विवाह मुहूर्तावर लावण्याचा समाज विधायक बदल स्वीकारावा, असे आवाहन मध्य प्रदेश माळी समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष काशिनाथ महाजन व जिल्हाध्यक्ष प्रभाकर चौधरी यांनी केले आहे.
मध्य प्रदेश सीमावर्ती भागातील बऱ्हाणपूर जिल्हा, खान्देशातील जळगाव जिल्हा व रावेर, मुक्ताईनगर, यावल तालुक्यातील आप्तस्वकीयांचे मोठे जाळे आहे. राज्यांची भाषिक वा प्रांतिक विभिन्नता असली तरी मायबोली मात्र मराठी आहे. त्या अनुषंगाने सीमावर्ती भागातील बऱ्हाणपूर जिल्हा माळी समाज मंडळाने रावेर तालुक्यातील रावेर, वाघोड खानापूर, रसलपूर आदी ठिकाणच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत समाज चिंतन सहविचार शिबिर आयोजित केले होते. त्यात विवाह मुहूर्तावर लावणे, वरातीतील डीजेचा वापर बंद करणे, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या नृत्यावर बंदी घालणे, साखरपुड्यात वधू-वरांचा कपडे बदलण्याची प्रथा थांबवून थेट नववस्त्र घालूनच वधू- वरांना दाखल करणे, वधूला मोबाइल गिफ्ट देण्याची पद्धत बंद करणे, प्री वेडिंग शूटिंग बंद करणे, अशा निर्बंधांवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.
महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील फूलमाळी समाज पंच मंडळाने विवाह अचूक मुहूर्तावर लावण्याचा बदल प्रत्यक्ष कृतीतून अंमलात आणला आहे. त्याचपद्धतीने खान्देशातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड भुसावळ, जामनेर तालुक्यांतील माळी समाजबांधवांनीही विवाह मुहूर्तावर लावण्यासह वेळ व पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी तथा समाज सुदृढ करण्यासाठी विधायक निर्णय अंमलात आणणे काळाची गरज असल्याचे आवाहन माळी समाज पंच मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष काशिनाथ महाजन व बऱ्हाणपूर जिल्हा माळी समाज अध्यक्ष प्रभाकर चौधरी यांनी केले आहे.