जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील सावदा येथील लेवाजगत समुहातर्फे लॉकडाऊन दरम्यान ऑनलाइन खुली आंतरराष्ट्रीय वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. बदलापूर येथील श्रेया फेगडेने प्रथम, खडका येथील सायली महाजन द्वितीय, सावदा येथील जिज्ञासा भारंबेने तृतीय, तर बदलापूर येथील सोहम पाटीलने चतुर्थ क्रमांक मिळवला.
वकृत्तव स्पर्धेचा निकाल मुख्यधिकारी सौरभ जोशी, लाला कोष्टी, सुरेश बेंडाळे, कैलास लवंगडे, शिवसेना सचिव शरद भारंबे, शामकांत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. प्रथम पारितोषिक चार हजार, द्वितीय पारितोषिक तीन हजार, तृतीय पारितोषिक दोन हजार, तर चौथे पारितोषिक एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र आहे. विजेत्यांची निवड जाहीर करण्यात आली. ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा लॉकडाऊन काळात घेण्यात आली होती. त्यासाठी मी एक कोरोना फायटर, कोरोना एक वैश्विक आव्हान, कोरोना एक संमिश्र अनुभव, कोरोना भविष्यातील सुसंधी, कोरोनाचा दूरगामी सामाजिक परिणाम, कोरोना लढाईत आरोग्यदूत, स्वच्छतादूत, पोलिस मित्र आणि वार्ताहर यांचे अमूल्य योगदान, प्रसार माध्यम काळाची गरज, ऑनलाइन शिक्षण योग्य की अयोग्य, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासन व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य सर्वांची जबाबदारी, लॉकडाऊनचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम व उपाय, लॉकडाऊनच्या वेळेचा सदुपयोग, भारतीय नागरिक म्हणून माझी जबाबदारी, सर्वसामान्यांची मानसिकता, लॉकडाऊन नंतर येणार्या समस्या व उपाय असे १५ विषय होते. विजेत्यांना लवकरच पारितोषिक वितरण केले जाणार आहे.
राज्यातील विविध गावांमधील स्पर्धकांचा सहभाग
राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, जळगाव, नागपूर, नाशिक या जिल्ह्यातील स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धकांच्या भाषणाला सोशल मीडियावर मिळणार्या लाईक्सचे ६० % गुण आणि मान्यवर परीक्षकांचे ४० % गुण, मिळालेले व्ह्यूज, कमेंट्स, शेअर्स यावर परीक्षण करण्यात आले.