जळगाव प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील एका पत्रकाराला न्यूमोनिया झाल्याने जळगाव शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना डॉक्टरांनी ‘टॉसिलीझूमॅब’ नावाचे इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला. मात्र, ते इंजेक्टशन मेडिकलमध्ये उपलब्ध झाले नाही. परिणामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या त्या पत्रकाराला इंजेक्शन देण्यास नकार दिला. या अनुषंगाने सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यात आली होती, या पोस्टची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्र दिले. त्यांच्या पत्रामुळे शासकीय रुग्णालयातून उपचारासाठी इंजेक्शन देण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील एका पत्रकाराला गोल्ड सिटी या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याला न्यूमोनिया झालेला असून, डॉक्टरांनी टॉसिलीझूमॅब नावाचे इंजक्शन तातडीने देण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना हे औषध शहरातील मेडिकलमधून उपलब्ध झाले नाही. त्यामुळे नातेवाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना भेटले. खासगी रुग्णालयातील रुग्णाला इंजेक्शन देण्याची परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले. खासगी रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यास इंजेक्शन देण्यात येईल, असा सल्ला त्यांनी दिला. राज्य सरकारच्या नियम व वैद्यकीय अनास्थेमुळे राज्यात आधीच एका पत्रकाराने आपला जीव गमावला आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा प्रशासनाने याबाबत माहिती घ्यावी.
याबाबत पत्रकार विजय वाघमारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ही पोस्ट मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनाही टॅग करण्यात आली. दरम्यान ही पोस्ट जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी जिल्हाधिकारी राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी राऊत यांनी त्या पत्रकाराला टॉसिलीझूमॅब इंजेक्शन देण्यात यावे, याबाबत वैद्यकीय अधिष्ठात्यांना पत्र दिले. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी ते पत्र तातडीने अधिष्ठाता यांच्यापर्यंत पोहोचविले. त्यानंतर काल त्या पत्रकाराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले.