जळगाव प्रतिनिधी : प्रभागातील विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी वाढविण्यासाठी ‘नगरसेवक डायरी’ योजना तात्काळ पुन्हा सुरू करावी, अशी मागणी करत महापौर दीपमाला काळे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन २०१३ ते २०१८ या कालावधीत जळगाव शहर महानगरपालिकेमार्फत ‘नगरसेवक डायरी’ ठेवण्यात येत होती. या डायरीमध्ये वॉर्डात करण्यात येणारी फवारणी, गटार साफसफाई, रस्ते स्वच्छता आदी कामांची संबंधित कर्मचाऱ्यांकडून नियमित नोंद केली जात होती. काम पूर्ण झाल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येत आणि त्यानंतर संबंधित नगरसेवकांचीही स्वाक्षरी करण्यात येत असे.
या पद्धतीमुळे वॉर्डात प्रत्यक्षात कोणती कामे झाली याची अधिकृत आणि पारदर्शक माहिती नागरिक व नगरसेवक दोघांनाही उपलब्ध होत होती. तसेच अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाच्या कामांवर तात्काळ लक्ष केंद्रित करणे शक्य होत होते. या उपक्रमामुळे प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास वाढला होता आणि कामांमध्ये उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण झाली होती.
मात्र, सध्या अशा प्रकारची नोंद पद्धत अस्तित्वात नसल्यामुळे अनेकदा कामे झाली अथवा नाही याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद व समन्वय राखण्यासाठी ‘नगरसेवक डायरी’ योजना पुन्हा सुरू करणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.















