लखनौ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेश सरकारने धर्मांतराच्या विरोधात जो कायदा संमत केला आहे त्याची गरज नाही, त्याचा फेरविचार केला जावा, अशी मागणी समाजवादी पार्टी आणि आता बसपा अध्यक्षा मायावती यांनी केली आहे.
उत्तर प्रदेश सरकारने अध्यादेशाद्वारे हा कायदा लागू केला असून त्यानुसार बरेली जिल्ह्यात पहिला गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्या संबंधात मायावती यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे की, यूपी सरकारने घाईगडबडीत हा कायदा लागू केला आहे.
देशात सक्तीच्या धर्मांतराला कोठेही मान्यता नाही. असे प्रकार रोखण्यासाठी देशात आधीच पुरेसे कायदे उपलब्ध आहेत. त्यामुळे सरकारने या नवीन कायद्याचा फेरविचार केला पाहिजे, असे मायावती यांनी म्हटले आहे. मुस्लीम समाजातील युवक जाणीवपूर्वक हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांचे धर्मांतर करतात, असा दावा केला जात आहे.
या प्रकाराला भाजप समर्थकांकडून लव्ह जिहाद असा शब्दप्रयोग वापरला गेला आहे. त्याच्या विरोधात उत्तर प्रदेश सरकारने हा कायदा संमत केला आहे. त्यावर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुखांनी प्रथमच हे मतप्रदर्शन केले आहे.