जळगाव (प्रतिनिधी) कंपनीत गुंतवणुक केल्यास अधिक नफा मिळेल असे सांगितले. त्यानंतर केलेल्या गुंतवणुकीवर तब्बल १८ लाख रुपये जमा झाल्याचे दाखवीत प्रकाश जानकीराम बडगुजर (वय ७९, रा. अमळनेर) या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ५ लाख ६० हजार रुपयांत ऑनलाईन ठगांनी गंडविले. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर येथील प्रकाश बडगुजर हे एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांना दि. १ मे रोजी रिधी वमर्वा नामक तरुणीने व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. त्यानंतर आकाश सिंग याने त्यांच्यासोबत संपर्क साधून एका कंपनीत गुंतवणुक करण्याचे अमिष दाखविले. त्यांनी कंपनीत गुंतवणुक केल्यास त्यावर अधिकचा नफा होईल असे सांगितले. त्यानुसार प्रकाश बडगुजर यांनी काही रक्कम गुंतवणुक देखील केली. गुंतविलेल्या रकमेवर नफा होवून ती रक्कम १८ लाख ८५ हजार रुपये झाल्याने ऑनलाईन ठगांनी एका अॅपमध्ये दाखविले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घेतली पोलिसात धाव
अधिकचा नफा मिळत असल्याचे अमिषापोटी बडगुजर यांनी वेळोवेळी त्यांच्याजवळ असलेली ५ लाख ६० हजार रुपयांची रक्कम त्या बनावट कंपनीत गुंतवली. परंतु त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना पैसे काढता येत नव्हते. त्यामुळे बडगुजर यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच सायबर पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार ऑनलाईन ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सतिष गोराडे हे करत आहे.
 
	    	
 
















