मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगरला लागून असलेल्या हायवेवरील केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर मोटारसाईकलने आलेल्या पाच अज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकला. ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली. तसेच आणखी एका पाठोपाठ याच चोरट्यांनी दोन पेट्रोल पंपावर देखील दरोडा टाकला. त्याच रात्री चोरट्यांनी मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप कर्की फाटा तालुका मुक्ताईनगर व त्यानंतर तळवेल फाटा येथील सय्यद पेट्रोल पंप, वरणगाव शिवार तालुका भुसावळ येथे देखील चोरट्यांनी रोख रक्कम व सीसीटीव्हीचा डी व्हीआर लंपास केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगरला लागुन महा मार्गावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा पेट्रोल पंप आहे. गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पाच अज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत केबिनमधील कॉम्प्युटर, सीसीटिव्हीसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तुंची तोडफोड केली आणि डिव्हीआर देखील लांबवला. फिर्यादी दिलीप रमेश खोसे (वय ४०, रा. पिंपरी राऊत ता. मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ तपास करीत आहे.
तिघेही पेट्रोल पंपावरील दरोड्यात गेलेला मुद्देमाल असा आहे की, १ लाख रुपये अंदाजे रोख रक्कम, रेडमी, मोटोरोला आणि आयक्यू कंपनीचे ११ हजार रुपये किमतीचे मोबाईल, १४ हजार रुपये रोख रक्कम, ६ हजार ५०० रुपये किमतीचे सीसीटीव्हीचे डीव्हीआर आणि ३५०० रुपये रोख असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयाचा मुद्देमाल तिघेही पेट्रोल पंपावरून चोरट्यांनी चोरून नेला आहे.
शुक्रवार रोजी घटनास्थळी पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप कुमार गावित, मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष कुमार अडसूळ या भेटीदरम्यान उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांच्या रक्षा पेट्रोलियम वरील कर्मचारी दिलीप खोसे व प्रकाश माळी या कर्मचाऱ्यांना मारहाण केली असून कर्मचाऱ्यांना एका केबिनमध्ये कोंबून ऐवज लांबविला आहे. दरोडेखोर वरणगावच्या दिशेने दुचाकीवरुन पसार झाले. मुक्ताईनगर व वरणगाव पो.स्टे.चे पोलीस दरोडेखोरांच्या मागावर आहेत.
 
	    	
 















