नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कॉंग्रेसच्या जनरल सेक्रेटरी प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यानंतर प्रियंका गांधींनीही स्वत: ला आयसोलेट केले आहे. प्रियंका गांधी यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून स्वत: ला वेगळे ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व प्रचारसभा रद्द करण्यात आल्या आहेत.
प्रियंका गांधी यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्गाच्या संपर्कात आल्याने मला आसाम विधानसभा निवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभा रद्द कराव्या लागत आहेत. काल माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला काही दिवस आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे. त्यामुळे मला प्रचाराला येता येणार नाही. तरीही काँग्रेसचा विजय होईल अशी मला आशा आहे, असं प्रियंका यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आसाममध्ये भाजपच्या उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरून प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. प्रिय निवडणूक आयोग, ही काय भानगड आहे? तुम्ही यावर देशासमोर खुलासा करणार आहात का? की निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला वणक्कम असं आम्ही म्हणायचं का? असा खोचक टोला प्रियंका यांनी लगावला आहे. तर, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही निवडणूक आयोगावर टीका केली आहे. निवडणूक आयोगाची गाडी खराब, भाजपची नियत खराब आणि लोकशाहीची हालत खराब, अशी टीका राहुल यांनी केली आहे.