चंद्रपूर (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील सिंदेवाही तहसील अंतर्गत लाडबोरी गावाच्या परिसरात धातूची एक गोलाकार रिंग आकाशातून पडली. शनिवारी रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागांत आकाशातून जलदगतीने काही लाल रंगाच्या वस्तू खाली येत असल्याचं स्थानिकांना दिसले. दरम्यान, आकाशातील ते अग्निगोळ रॉकेटचे तुकडे किंवा एखाद्या उपग्रहाचे अवशेष असावेत असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.
सिदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे रात्री 7 वाजून 45 मिनिटांनी एक धातूची रिंग कोसळली. आकाशात ही रिंग जेव्हा होती ती लाल तप्त होती. ती एवढ्या जोराने जमिनीवर पडली की मातीमध्ये ती रुतली. ही रिंग आठ फुटाच्या व्यासाची आहे. उल्कापातासारखी दिसणारी ही रोषणाई आकाशात दिसून आली असली तरी आता या वेगाने जाणाऱ्या वस्तुचे काही अवशेष चंद्रपुरामध्ये आढळून आले आहेत. आठ फूट बाय आठ लांबीची एक रिंग सिंदेवाहीत आढळली आहे. तर एक भलामोठा लोखंडी गोळा देखील सापडला आहे.
हे एखाद्या उपग्रहाचे अवशेष असावेत, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. सुरवातीला ही घटना उल्कापाता सारखी असल्याचे वाटत होते. परंतु ज्या तीव्रतेने ती वस्तू पेटली होती, तसेच तिचे तीन ते चार तुकडे जमिनीकडे झेपावत होते. तसे हा उल्कापात नसल्याचे स्पष्ट झाले होते. दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातही आगीच्या ज्वाळेप्रमाणे वस्तू जोरदारपणे खाली कोसळल्याची चर्चा सुरू आहे. परंतु याची अधिकृत माहिती मिळाली नाही. कुणी याला अंतराळ यानाचे तुकडे तर कुणी रॉकेटचा बूस्टर म्हणून सांगत आहेत.